जळगांव जा. मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही…15 जणांनी 21 अर्ज उचलले …!
दयालसिंग चव्हाण
संग्रामपूर /- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी मंगळवार 22 ऑक्टोबर पासुन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात सुरुवात झाली असून जळगांव जामोद विधानसभा मतदार संघात पहिल्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. पण 15 जणांनी 21 नामनिर्देशन पत्रे घेतली आहेत. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी शैलेश काळे यांनी दिली. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन दाखल करण्यास आज पासून प्रारंभ झाला आहे. सुट्टीचे दिवस वगळता 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी तर 4 नोंव्हेबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदान 20 नोंव्हेबर रोजी होणार आहे.निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन व्हावे. यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी. अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश काळे यांनी दिल्या आहेत. सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार प्रशांत पाटील, तहसिलदार पवन पाटील, यांसह इतर कर्मचारी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जळगांव जामोद मतदार संघात एकूण मतदार- ३ लाख २ हजार असून मतदान केंद्रांची संख्या -३१७ आहे.भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.संजय कुटे यांच्या नावाची घोषणा झाली असून महाविकास आघाडी,वंचित, इतर पक्षाने कडून अद्यापपर्यंत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.आज मंगळवारी पहिल्या दिवशी 21 इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र घेवून गेले आहेत. आज पहिला दिवस असून एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे पहिला दिवस हा निरंक गेलेला आहे.

