राहुल ट्रेडर्सचे मालक अरुण मारोडे यांना रु. 25,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश..; महाराष्ट्र राज्य, मानवाधिकार आयोगाचा ऐतिहासिक निकाल ! 9 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी होणार ..?

0
57

राहुल ट्रेडर्सचे मालक अरुण मारोडे यांना रु. 25,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश..; महाराष्ट्र राज्य, मानवाधिकार आयोगाचा ऐतिहासिक निकाल ! 9 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी होणार ..?

दयालसिंग चव्हाण
संग्रामपूर /- सदर प्रकरणाची माहिती अशी की, राहुल ट्रेडर्स चे मालक अरुण आबाराव मारोडे रा.पळशी झाशी ता.संग्रामपूर हे एक प्रतिष्ठीत व्यापारी असून त्यांचा धान्य खरेदी विकीचा वैधानिक व्यवसाय असून दिनांक 08.02.2022 रोजी बाळापूर हददीत एलसीबी च्या पोलीसांनी त्यांचा ट्रक पकडला व कुठलिही पुर्व चौकशी न करता व कायदयाच्या तरतुदी ज्या ई.सी. अॅक्ट मधे नमुद आहे त्याचे पालन न करता सरळ गुन्हा दाखल केला होता व पोलीसांच्या कायदयाच्या अज्ञानतेमुळे सरजराजपाल व राजारामपाल या व्यक्तींना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत निष्कारणपणे ठेवण्यात आले व पोलीसांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता व अरुण मारोडे यांना कागदपत्रांची मागणी न करता व पुरवठा अधिकारी यांचेकडून जप्त केलेल्या मालाची पडताळणी न करता व पत्र न घेता सरळ गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यानंतर अरुण आबाराव मारोडे यांनी अटकपूर्व जमानत मिळवली व त्यांचे कागदपत्र व जप्त माल हा वैध असून तो काळाबाजारीसाठी बाजारात जात नसल्याचे सिध्द केले व त्यानंतर पुरवठा निरीक्षण अधिकारी / तहसीलदार यांनी सुध्दा प्रमाणित केले की, सदरचा माल हा राशन वितरण प्रणालिचा नसल्याचे प्रमाणीत करुन प्रमाणपत्र सुध्दा दिले.

सदरचा माल हा राशन वितरण प्रणालिचा नसल्या कारणाने व कुठलाही गुन्हा घडला नसल्याने पोलीसांनी केलेले गैरकृत्य व कायदयाच्या तरतुदीची अवहेलना लपविण्याचे दृष्टीने व स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने आरोपी विरुध्द नजरचुकीने गुन्हा दाखल झाला हे कारण देत अरुण आबाराव मारोडे व सरजराजपाल व राजारामपाल यांना गुन्हा कमांक 304/2022, जिवनावश्यक वस्तु कायदयाचे कलम 3 व 7 चे आरोपातून मुक्तता करण्यासाठी ‘क’ समरी अहवाल बाळापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आली. तसेच आरोपी विरुध्द कुठलाही पुरावा नसल्याकारणाने आरोपींना बाळापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोषमुक्त केले.

तसेच सदरचा गुन्हा हा चुकीच्या पध्दतीने नोंदविल्यामुळे अरुण आबाराव मारोडे यांना 70 दिवस विनाकारण ट्रकचे भाडे भरावे लागले व त्यापोटी अंदाजे साडेसहा लाख रुपयाचा भुर्दंड सोसावा लागला. तसेच जप्त केलेला माल हा राशन प्रणालिचा नव्हता तरी देखील तो सुपुर्दनाम्यावर परत मिळविण्यासाठी अकरा महिने लागले व तो 243 क्विंटल तांदुळ हा अकरा महिने सरकारी गोडाउन मध्ये जप्त व जमा असल्याकारणाने अरुण आबाराव मारोडे यांचे व्यापाराचे चेक ठप्प झाले व त्यामुळे त्यांना अंदाजे 70 ते 75 लाख रुपयाचे नुकसान झाले.

पोलीसांच्या अशाप्रकारच्या अरेरावीमुळे व अधिकाराच्या दुरुपयोगामुळे तसेच कायदयाच्या अज्ञानतेमुळे सोसावे लागलेल्या नुकसानामुळे व्यथीत होवून अरुण आबाराव मारोडे यांनी अॅडव्होकेट विद्यासागर अलोणे यांचे मार्फत महा. राज्य मानवाधिकारी आयोग यांचेकडे तकार केली व नुकसानभरपाईची मागणी केली. त्यामध्ये आय.जी. अमरावती ते एल.सी.बी. चे कार्यरत शिपाई ज्यांनी सदरचा ट्रक पकडून रिपोर्ट दिला होता त्यांचे विरुध्द केस दाखल केली होती.

प्रदीर्घ सुनावणी नंतर व अॅडव्होकेट विद्यासागर अलोणे यांनी केलेल्या युक्तिवादानंतर मा. मानवाधिकार आयोग यांनी अरुण आबाराव मारोडे यांचे मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याचे मान्य केले व अरुण आबाराव मारोडे यांना पंचेवीस लाख रुपयाची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदरची नुकसानभरपाई ही आदेश मिळाल्यापासून सहा आठवडयाचे आंत अरुण आबाराव मारोडे यांना देण्यात यावे असे आदेशात नमुद आहे. त्यामुळे सदरचा निकाल हा ऐतिहासीक निकाल असून या निकालापासून पोलीस प्रशासन व व्यापारी यांना एक मार्गदर्शक तत्वांचा बोध मिळेल.

तसेच आयोगाने आदेशात हे देखील म्हटले आहे की, अरुण आबाराव मारोडे यांचा 243 क्विंटल तांदुळ हा राशन प्रणालिचा नव्हता तर तो अकरा महिन्यापर्यंत त्यांना का सोपविण्यात आला नाही हा देखील एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो जो प्रतिवादी यांच्या अनियंत्रीत कामकाजाचा प्रत्यय येतो.

न्यायनिवाड्यामधील आदेश येणेप्रमाणे :

1 स्पेशल आयजीपी अमरावती रेंज व पोलीस अधीक्षक, अकोला यांनी गैरअर्जदार क. 3 ते 11 ज्यामध्ये एल.सी.बी., पी.आय. तसेच एल.सी.बी., पी.एस.आय. तसेच तपास अधिकारी यांचे विरुध्द डिपार्टमेंटल चौकशी करावी व त्यांनी केलेल्या कायदयाच्या आदेशाचे व तरतुदींचे सरसकट अवहेलना केल्याबदद्ल चौकशी करण्यात यावी.

2 गैरअर्जदार क. 3 ते 11 यांनी आदेश मिळाल्यापासून सहा आठवडयाचे आंत तकारदार अरुण मारोडे यांना रु. 25,00,000/- (अक्षरी रुपये पंचेवीस लाख फक्त) ची नुकसानभरपाई संयुक्तिकरित्या किंवा वेगवेगळी दयावी व तसे न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 08 टक्के व्याज दराने जोपर्यंत संपूर्ण रक्कम अरुण आबाराव मारोडे यांनी मिळत नाही तोपर्यंत व्याजासह देण्यात यावी.

3 अरुण आबाराव मारोडे यांना प्रतिवादी यांच्या कथीत दुर्भावनापुर्ण कृतीमुळे व त्यांना झालेल्या नुकसान व प्रतिष्ठेला हानी झाल्यामुळे त्यांना स्वतंत्ररित्या प्रतिवादींवर कारवाई करण्याची मुभा देण्यात येत आहे.

4 आदेशाची प्रत अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे कार्यालयाकडे पाठविण्यात यावी व या आयोगाशी संलग्न सचिव, आय.जी.पी. अमरावती परिक्षेत्र आणि एस.पी. अकोला यांना माहिती व आवश्यक कारवाईसाठी पाठविण्यात येत आहे.

या सर्व शिफारशींसह तकार निकाली काढण्यात येत आहे…

अरुण आबाराव मारोडे यांचे म्हणने :-
मा. मानवाधिकारी आयोग, म.रा. मुंबई यांनी दिलेल्या निकालाचे स्वागत करण्यात येत असून या निकालामुळे माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास दृढ झालेला आहे तसेच मला मिळालेली नुकसानभरपाईची रक्कम ही वाढवून घेण्याकरिता मी योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन घेवून वाढीव रकमेकरिता अपीलात जाणार आहे असे अरुण आबाराव मारोडे यांचेशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली.

कोणत्या अधिका-या विरुध्द दिले आहेत आदेश

1 श्री मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, ता. व जिल्हा अकोला.

2 श्री दत्ता ढोरे, हेड कॉन्स्टेबल, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, ता. व जिल्हा अकोला.

3 श्री विशाल मोरे, ना.पो.कॉ., स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, ता. व जिल्हा अकोला.

4 श्री संदिप टाले, पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, ता. व जिल्हा अकोला.

5 श्री रवि पालिवार, पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, ता. व जिल्हा अकोला.

6 श्री श्रीकांत पातोंड, पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, ता. व जिल्हा अकोला.

7 श्री आव्हाडे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बाळापूर, जिल्हा अकोला.

8 श्री गजानन राहाटे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन बाळापूर, जिल्हा अकोला.

9 श्री संतोष महल्ले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, ता. व जिल्हा अकोला.